आपले फेसबुक पेज

Saturday 20 April 2013

सातारा जिल्हा विषयही थोडी फार माहिती

सातारा जिल्हा विषयही थोडी फार माहिती...
‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्या समर्थ रामदासांच्या अस्तित्वाने पावन झालेला व त्यांची समाधी असलेला आणि छत्रपतींच्या गादीचे स्थान असलेला सातारा जिल्हा. महाबळेश्र्वरसारखे निसर्गरम्य ठिकाण असलेला, तसेच सुंदर कृष्णाकाठ लाभलेला आणि शिक्षणाची गंगोत्री असलेला हा जिल्हा. या जिल्ह्याने देशासाठी सर्वांत जास्त (संख्येने) बलिदान दिले असल्यामुळे याला शहीद सैनिकांचा जिल्हा असेही म्हणावे लागेल.
या जिल्ह्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली. याच जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने (संयुक्त) महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले. यशवंतराव यांनी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास साधला; केंद्रीय पातळीवरही परिपक्व नेते म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

ऐतिहासिक महत्त्वाचे :-
सातारा जिल्हा व परिसरात पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादवी, बहामनी व आदिलशाही या राजवटींनी राज्य केले. कोल्हापूर व सातारा परिसराचा इतिहास प्रामुख्याने मराठेशाहीशी जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. ही गादी थोरली पाती म्हणून ओळखली जाते. १७०८ मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातारा गादीवर झाला होता. पुढे काही काळ मराठेशाहीत दुर्दैवी संघर्ष चालू होता, परंतु वारणा नदीकाठी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू व राजारामांचे पुत्र दुसरा संभाजी यांचेमध्ये (१७३१) तह झाला, आणि कोल्हापूर व सातारा या सिंहासनांमधील दुही संपली. छत्रपती शाहू महाराज अनेक वर्षे सातार्याच्या गादीवर विराजमान होते.
शिवकालीन इतिहासातही सातार्याचे स्थान महत्त्वाचे होते. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट जेथे झाली ते ठिकाण चाफळ (तालुका पाटण) याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवरायांनी अफझलखानाचा शिताफीने वध केला. ही घटना छत्रपतींच्या मुत्सद्देगिरीची, शौर्याची व गनिमी कावा तंत्राची साक्ष देणारी घटना होय. शिवशाहीच्या काळापासून या जिल्ह्याला लष्कराची -जिल्ह्यातील तरुणांना सैनिक होण्याची- ओढ आहे. स्वातंत्र्यानंतरही लष्करात सामील होणार्या तरुणांचे प्रमाण या जिल्ह्यात सर्वांत जास्त आहे. तसेच आत्तापर्यंतच्या अनेक युद्धांत शहीद झालेल्या सैनिकांची संख्या पाहता हाच जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळींत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या जिल्ह्याचे नेतृत्व केले. श्री.नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातला पण त्यांनी कार्य केले प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात. १९४३ ते १९४६ या काळात त्यांनी सातारा भागात सुमारे १५० गावांमध्ये प्रति -सरकार स्थापन केले होते. स्वातंत्र्यानंतर श्री. पाटील यांनी लोकसभेतही सातार्याचे प्रतिनिधित्व केले. १९५७ च्या सुमारास त्यांनी संसदेत मराठीतून भाषण केले होते.

भूगोल :-
सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे. जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर असल्याने येथे हवामान थंड व आल्हाददायक असते. पावसाचे प्रमाण विषम असून, पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात, महाबळेश्र्वर भागात पाऊस जास्त पडतो, तर पूर्वेकडील खटाव, माण या तालुक्यांत तो अतिशय कमी पडतो.


कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा, माणगंगा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. महाबळेश्र्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्र्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे. जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने सह्याद्रीत उगम पावून पूर्व व दक्षिणेकडे वाहणार्या आहेत. कृष्णा या प्रमुख नदीचा जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १६० कि.मी. लांबीचा आहे. जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम झालेला आहे.

कोयना नदीवरील पाटण तालुक्यातील प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्माण केली जाते. हा राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. राज्यात सर्वांत जास्त जलविद्युत निर्मिती (सुमारे १००० मेगावॅट) सातारा जिल्ह्यात केली जाते. कोयना, धोम, कन्हेर ही येथील प्रमुख जलविद्यूत निर्मिती केंद्रे आहेत. कोयना प्रकल्पात लेक टॅपिंगचा प्रयोगही यशस्वी करण्यात आलेला आहे.
पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवाजीसागर असे म्हटले जाते. राज्यातील या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासह कृष्णा नदीवरील धोम येथील धरण, वेण्णा नदीवरील कन्हेर येथील धरण व नीरा नदीवरील वीर येथील धरण हे महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या शासनाच्या संस्थेच्या वतीने पवनउर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प मानला जातो. सर्वात जास्त पवनचक्क्या सातारा जिल्ह्यातच आहेत. वनकुसवडेसह ठोसेघर, चाळकेवाडी, माळेवाडी येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. सातार्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रे आहेत.
जिल्ह्याच्या पश्र्चिम भागातील महाबळेश्र्वर, पाटण, वाई व जावळी या डोंगराळ भागात तुलनेने दाट वने आहेत. कोयना नदीच्या खोर्यात पाटण, जावळी या भागांत कोयना अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे वन्यजीव अभयारण्य असून येथे वाघ, रानडुक्कर, सांबर, गवा हे प्राणी हमखास आढळतात. जिल्ह्यातील मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आलेले आहे. चांदोली (जि. सांगली, ता. बत्तीस शिराळा) हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य हे येते. या अभयारण्यात सातारा जिल्ह्यातील ३ गावांचा (कर्हाड परिसरातील) समावेश होतो.


लोकसंख्या - (संदर्भ - जनगणना २००१)
क्र तपशील संख्या
१ क्षेत्रफळ १०,४८०.० चौ. कि. मी.
२ लोकसंख्या एकूण २८,०८,९९४
२.१ पुरुष १४,०८,३२६
२.२ स्त्रिया १४,००,६६८
२.३ ग्रामीण २४,१०,८७३
२.४ शहरी ३,९८,१२१
३ स्त्री- पुरुष गुणोत्तर १०००:९९५
४ साक्षरता एकूण ७८.२२ %
४.१ पुरुष ८८.२० %
४.२ स्त्री ६८.३८ %

प्रशासन :-
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ : (संदर्भ जनगणना २००१)
सातारा जिल्ह्यातील एकूण ११ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे-
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ महाबळेश्र्वर ३७८.९ ५४,५४६
२ वाई ६२२.६ १,८९,३३६
३ खंडाळा ६००.२ १,१९,८१९
४ फलटण १,१७९.६ ३,१३,६२७
५ माण १,६०८.२ १,९९,५९८
६ खटाव १,३७४.० २,६०,९५१
७ कोरेगांव ९५७.९ २,५३,१२८
८ सातारा ९५३.५ ४,५१,८७०
९ जावळी ८६९.० १,२४,६००
१० पाटण १,४०७.८ २,९८,०९५
११ कराड १,०८४.८ ५,४३,४२४

जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.
क्र तपशील संख्या नावे
१ नगरपालिका ०८ सातारा, कर्हाड, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, महाबळेश्र्वर, पाचगणी.
२ जिल्हा परिषद ०१ सातारा
३ पंचायत समित्या ११ सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्र्वर, कर्हाड, पाटण, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, जावळी
४ ग्रामपंचायती १४८३ ------
राजकीय संरचना :-
लोकसभा मतदारसंघ (१) -जिल्ह्यात सातारा हा एक लोकसभा मतदारसंघ असून ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विधानसभा मतदारसंघ (८) - वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा, फलटण व माण. (फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.)
जिल्ह्यात ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १३४ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

शेती :-
वाई, सातारा, कर्हाड, पाटण व जावळी या प्रामुख्याने कृष्णेच्या खोर्यातील भागांत जास्त सुपीक जमीन आढळते. सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. माण, खटाव, फलटण या कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय असल्याने येथे उसाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
देशातील पहिले आले संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे केंद्रीय कृषी खात्याने स्थापन केले आहे. तसेच पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र स्थापण्यात आले आहे.

लागवडीखालील क्षेत्र :-
क्र तपशील क्षेत्र (हेक्टर)
१ निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ५,५४,०००
२ जिरायत क्षेत्र ३,७५,०००
३ बागायत क्षेत्र १,७६,५००
हंगामनिहाय पिकांचा तपशील :-
क्र हंगाम प्रमुख पिके
१ खरीप तांदूळ, बाजरी, भुईमूग
२ रब्बी गहू, हरभरा
३ खरीप व रब्बी ज्वारी व उस

उद्योग :-
जिल्ह्यात सातारा, कर्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना; सातार्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना; शिरोळे येथील कागद गिरण्या हे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग आहेत. महाबळेश्र्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र असून येथील शुद्ध मध प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उद्योग केला जातो.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सूची :-
क्र नाव गाव, तालुका
१ किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज,वाई
२ श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण
३ बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर, पाटण
४ कृष्णा सह. साखर कारखाना रेठरे बुद्रुक, कराड
५ सह्याद्री सह. साखर कारखाना यशवंतनगर, कराड
६ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर, सातारा
७ जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना चिमणगाव, कोरेगाव
न्यू फलटण इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने फलटण तालुक्यात साखरवाडी येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाना उभारला आहे.

दळणवळण :-
मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट; सातारा-रत्नागिरी रस्त्यावरील कुंभार्ली घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट असून, वाई-महाबळेश्र्वर रस्त्यावरील पसरणी घाट व महाबळेश्र्वर - महाड मार्गावरील पार घाट हे घाटदेखील निसर्गसुंदर व उपयुक्त आहेत.
सातार्याचे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई २७२
नागपूर ७६९
औरंगाबाद ३३८
रत्नागिरी २४२
पुणे ११२
संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा समर्थ उद्योग, औरंगाबाद.

पर्यटन :-
महाराष्ट्राभिमान जागवणार्या, छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणार्या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. सातार्याजवळील सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. गडावर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिरही आहे. रामदासी पंथाचे महाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. पाटण तालुक्यातील चाफळ या गावीही समर्थांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी दोन मारुतींची मंदिरे येथेच आहेत. याच मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे मानले जाते.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असा प्रतापगडाशी जोडलेला इतिहास सर्वज्ञात आहेच. प्रतापगड महाबळेश्र्वर तालुक्यात असून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अफझलखानाची कबर येथे आहे. शिखर शिंगणापूर हे स्थान जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. शंभू-महादेवाचे येथील मंदिर राज्यात प्रसिद्ध असून, हे एक जागृत देवस्थान मानले जाते. खटाव तालुक्यातील औंध हे पूर्वीचे संस्थान. संस्थानी वातावरणाच्या खुणा आजही येथे दिसतात. येथील वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून, येथील डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी ही राज्यातील अनेकांची कुलदेवता आहे.
माण तालुक्यातील गोंदवले येथे थोर श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे. यांनीच महाराष्ट्रात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचा प्रसार केला. वाई तालुक्यातील मांढरदेव हे गाव प्रसिद्ध असून येथे काळूबाईची मोठी यात्रा भरते. येथे हिंदू-मुस्लीम धर्मांचे भाविक गर्दी करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील फलटण येथे संस्थानी वातावरणाच्या खुणा आढळतात. येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. फलटण हे महानुभव संप्रदायाचे प्रमुख केंद्र असून फलटणला महानुभव पंथाची काशीच म्हटले जाते. येथील श्रीकृष्ण मंदिर व चक्रधर स्वामींचे मंदिर प्रेक्षणीय आहे.
महबळेश्र्वर व पाचगणी ही भारतातील सुप्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत. ब्रिटिश काळात महाबळेश्र्वर ही मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा प्रथम विकास केला. सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादव काळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महबळी या नावावरून आसपासच्या वस्तीचे महाबळेश्र्वर असे नामकरण झाले, अशी कथा प्रचलित आहे. पश्र्चिम घाटाची डोंगररांग, उंच कडे, खोल दर्या, दाट जंगले यांचे विपुल प्रमाण महाबळेश्र्वरमध्ये असून ब्रिटिश काळापासून काही मूलभूत सोयीसुविधांचा विकास येथे झालेला आहे. महाबळेश्र्वर हे समुद्रसपाटीपासून सुमारे १३७२ मीटर उंचीवर असून या उंचीवर पठारावर वसलेले आहे. येथील लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, एलफिस्टन पॉईंट, ऑर्थर सीट, लिंगमाळा धबधबा, वेण्णा तलाव इत्यादी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. महाबळेश्र्वरजवळ क्षेत्र महाबळेश्र्वर येथे श्रीमहाबळेश्र्वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. पूर्ण भारतातून येणारे तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकही येथे गर्दी करतात. महाबळेश्र्वरपासून सुमारे २० कि. मी. अंतरावर असलेले पाचगणी हेही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून याला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे भारतातील स्वित्झर्लंड म्हटले जाते.
कोयना नदीच्या परिसरात वासोटा नावाचा दुर्गम किल्ला आहे. यास व्याघ्रगड असे म्हटले जाते. येथे मानवी वस्ती अतिशय कमी असून; वन्य श्र्वापदांचा येथे मुक्त संचार असतो. येथील परिसरात घनदाट जंगल असून पट्टीचे पर्यटक व गिर्यारोहक यांचे हे आवडते ठिकाण आहे. सातारा-कास-फळणी मार्गे वासोट्याला जाता येते.
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या खुद्द सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार राजवटीत राजा दुसरा भोज याने बांधल्याची नोंद इतिहासात सापडते. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला होता. सातार्यातील छत्रपती वस्तुसंग्रहालयही प्रसिद्ध आहे.
शहराजवळील माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. सातार्यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सुंदरता व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.
वाई हे सुंदर कृष्णाकाठ लाभलेले गाव असून येथे अनेक घाट नदीवर विकसित केलेले आहेत. वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे, तसेच येथील गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे. कोयना प्रकल्प (शिवाजीसागर), वेण्णा नदीवरील कन्हेर धरण व कृष्णेवरील धोम धरण ही सर्व ठिकाणे नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहेत. कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान विकसित करण्यात आले असून पर्यटक येथेही मोठ्या संख्येने भेट देतात. पालीचा खंडोबा, ठोसेघर धबधबा ही जिल्ह्यातील ठिकाणेही प्रसिद्ध आहेत. सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेल्या या जिल्ह्यातील कर्हाडला कर्हाकडा असेही म्हटले जाते. येथून जवळ असलेल्या आगाशिवा डोंगरात बौद्धकालीन लेणी सापडली आहेत.

सामाजिक / विविध :-
शिक्षण - कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला परंतु त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यात. महात्मा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहूंच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले; आणि १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. याच वर्षी कर्मवीरांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाउसची स्थापना केली. छत्रपती शिवाजी कॉलेज हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या वतीने १९४७ मध्ये सुरू करण्यात आले. राजर्षी शाहूंचा वारसा चालवणार्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. ‘स्वावलंबी शिक्षण’ आणि ‘कमवा व शिका’ ही सूत्रे विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणार्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार सातारा जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे.
शैक्षणिकदृष्ट्या सातारा जिल्हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. विद्यापीठाच्या अखत्यारीतील एकूण ५६ महाविद्यालये सातारा जिल्ह्यात आहेत. महाबळेश्र्वर तालुक्यातील पाचगणी येथे दर्जेदार निवासी शाळा आहेत. हे जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले असून संपूर्ण भारतातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी विकसित केलेल्या कर्हाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सातार्यातील सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळाही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ही सैनिकी शाळा १९६१ मध्ये, यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्थापन केली. ही भारतातील पहिली सैनिकी शाळा असून आज या शाळेत सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इतर संस्था - वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्र्वकोश निर्मिती महामंडळाचे कार्यालय आहे. याच महामंडळाच्या कामाद्वारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी भाषेची सेवा केली व वाईचा लौकिक वाढवला.
पुण्यातील अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेचे ग्रामीण उद्योजकता विकास केंद्र फलटण तालुक्यातील गणेशनगर येथे आहे. डॉ. आनंद कर्वे हे थोर शास्त्रज्ञ या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. डॉ. कर्वे यांना पर्यावरण व ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अँश्डेन पुरस्कार (ग्रीन ऑस्कर) प्राप्त झालेला आहे.

विशेष व्यक्ती :-
झाशीची राणी लक्ष्मीबाई (धावदाशी येथे जन्म), पेशवाईतील तत्त्वनिष्ठ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे(माहुली)या दोहोंचा जन्म सातारा जिल्ह्यातच झाला होता. त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णुशास्त्री पंडित, ‘सुधारक’कार आगरकर व भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले यांचाही जन्म याच जिल्ह्यात झाला होता.
ज्यांची कारकीर्द नाशिक येथून बहरली असे यशस्वी नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म जिल्ह्यातील रहिमतपूर इथला, तर गो.पु.देशपांडे, बाळ कोल्हटकर, ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र भट (वाई) हे कलावंतदेखील मूळचे इथलेच. ज्येष्ठ लेखिका गौरी देशपांडे यांचे वास्तव्य अनेक वर्षे फलटणजवळील विंचूर्णी या गावी होते. या गावाचे संदर्भ त्यांच्या लेखनात डोकावलेले दिसतात.
फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले आहे.
ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कर्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कास्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कराडमध्ये झाले होते. ऑलिंपिकला जाण्यासाठी कराडमधील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले होते.
ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोहोंनी आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला आहे.
कराड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कर्हाडचे नाव स्व. यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कर्हाडच्या (सातारा जिल्ह्याच्याही) शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणार्या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रीपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.

फेसबुक पेज : फेसबुक|सातारा


9 comments:

  1. www.godjodi.com complete 100 % free matrimony website created by satara guys please visit.

    ReplyDelete
  2. I like the History Of Stars District -- I was working at Stars District Court as a Typist Clerk (Faltan)

    ReplyDelete
  3. I Love Satara and it's history as well as cities like Faltan/Wai/Mahuli/Patna/Mhabaleshvar/Koregav/Rahimtpur etc

    ReplyDelete
  4. At that time Pune Peshva was under the rule of Satara's Shahu Raje & price of it

    ReplyDelete
  5. सातारा नाव हे ७ तारे डोंगर मंजे अजिंक्य तारा ई वरुन अल असावे-किंवा कोणी मुस्लिम अब्दुल सतार असावा--औरंगजेब ची मुलगी झेबुनिसा इथे होती-अजिंक्य तारा पूर्वी मुस्लिम अजीम तारा असावा अस वाटत इतिहास फार मनोरन्जक आहे

    ReplyDelete
  6. सातारात माझे पंजोबा ब्रिटिश गवर्मेन्ट अंडर सरकारी सनदी वकील होते (शनिवारात त्यांचा वाड़ा आहे)-आई चे वडील वासुदेव राव कुंभारे 1 निष्णात वैद्य होते--न माहुली घाटा वर सातार च्या राज घराने चे अन्त्य विधि ही करत -त्यात त्याना 4/500एकर जमीन दान मणुन मिळाली जस बजाज स्कूटर ची जमीन आमचीच होती माहुली तीर्थ क्षेत्र विधीस प्रसिद्ध आहे

    ReplyDelete
  7. आमच्या घराणे चा इतिहास 1850 पर्यन्त चा माहित आहे जस पूर्वी च्या ब्रिटिश सनदा ई

    ReplyDelete
  8. सज्जन गड हे श्री स्वामी समर्थ रामदास स्वामिन च्या ""दास बोध-""उपयुक्त ग्रन्थ लिखाण करता प्रसिद्ध आहे -1 वेळ अवश्य भेट द्यावी न दासबोध वाचावा ---गोंदवले येथे राम मंदिर आहे-झरण्डेशवर येथे मारुति मन्दिर आहे-चाफळ च राम मंदिर प्रसिद्ध आहे-कास तलाव पठार मन मोहक आहे

    ReplyDelete
  9. वीर झाशी ची राणी ही देखील सातार ची च धावडशी गांव ह्यांच माहेर -महाबलेश्वर येथे पंच गंगे चा उगम प्रेक्षणीय

    ReplyDelete

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन